माणिकदौंडी घाटात ग्रॅनाईटच्या ट्रकचा भीषण अपघात; चालकासह किन्नर गंभीर जखमी

पाथर्डी( लक्ष्यवेध न्यूज) :- पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटामध्ये शुक्रवारी पहाटे ग्रॅनाईट फरशी वाहून नेणाऱ्या अवजड ट्रकचे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक व गाडीत असलेला एक किन्नर गंभीर जखमी झाला असून ट्रकचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. बिपिन उलमूलवे (वय ४०)व गणेश गोतवे (वय २८) रा. लातूर असे जखमी झालेल्या चालकाच्या व किन्नर चे नाव आहे.
ही घटना घाटातील धोकादायक उताराच्या वळणावर घडली.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक बारामती येथून पाथर्डीकडे येत होता. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रॅनाईट फरशी भरलेली होती. माणिकदौंडी घाटातील तीव्र उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक भरधाव वेगात रस्त्याच्या बाजूच्या नाल्यात जाऊन घाटाच्या डोंगरकपारीवर आदळला. अपघात इतका भीषण होता की ट्रक पूर्णपणे पलटी होऊन त्याचा चक्काचूर झाला.अपघाताची चाहूल लागताच गाडीत असलेल्या किन्नराने जीव वाचवण्यासाठी ट्रकमधून उडी मारली. मात्र उडी घेताना त्याला गंभीर दुखापत झाली.
तर चालक ट्रकसोबत अपघातात अडकून गंभीर जखमी झाला.ट्रक पलटी झाल्याने त्यामधील ग्रॅनाईट फरशांचा मोठा खच रस्त्यावर पडला होता. त्यामुळे घाटातील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. जखमींना तौफिक मणियार यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल धनराज चाळक व कानिफनाथ गोफणे यांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील फरशांचा खच बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील करंजी व माणिकदौंडी हे घाट रस्ते दिवसेंदिवस अपघातांचे आणि मृत्यूचे सापळे बनत चालल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
घाटातील धोकादायक वळणे, अरुंद रस्ता आणि वाढती अवजड वाहनांची वाहतूक यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातून होत आहे.



