Breking Newsआरोग्यमहाराष्ट्र

पुण्यात FDAची मिठाई विक्रेत्यांवर धडक कारवाई! ८ प्रसिद्ध सेंटरची तपासणी; ५१२ किलो मिठाई नष्ट, दोन ठिकाणी परवान्याचा अभाव

पुण्यातील बुधवार पेठेत FDAची धडक कारवाई. आठ मिठाई सेंटरची तपासणी, ५१२.१ किलो मिठाई नष्ट, दोन आस्थापनांकडे परवाना किंवा नोंदणी नसल्याचे उघड.

पुण्यात FDAची मिठाई विक्रेत्यांवर धडक कारवाई! ८ प्रसिद्ध सेंटरची तपासणी; ५१२ किलो मिठाई नष्ट, दोन ठिकाणी परवान्याचा अभाव

पुणे : मिठाई खरेदी करताना ग्राहकांनो सावधान! पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मिठाई विक्रेते आणि उत्पादकांविरोधात मोठी कारवाई केली आहे. बुधवार पेठ परिसरातील तब्बल आठ मिठाई सेंटरची तपासणी करत प्रशासनाने ५१२.१ किलो मिठाई जप्त करून जागेवरच नष्ट केली आहे. या मिठाईची किंमत तब्बल २ लाख ८८ हजार २०० रुपये असल्याची माहिती आहे. तपासणीदरम्यान काही ठिकाणी अस्वच्छ वातावरणात मिठाई तयार केली जात असल्याचे, तर दोन आस्थापनांकडे आवश्यक परवाना किंवा नोंदणी नसल्याचे आढळून आले.

‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत कारवाई

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ ही मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत २७ नोव्हेंबर रोजी पुण्यातील बुधवार पेठ परिसरात FDAच्या परिमंडळ ६ आणि ८ च्या पथकांनी मिठाई विक्री व उत्पादन करणाऱ्या आठ आस्थापनांची तपासणी केली.

या तपासणीमध्ये अनेक ठिकाणी स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. काही ठिकाणी आवश्यक परवाना किंवा नोंदणीशिवाय व्यवसाय सुरू असल्याचेही समोर आले. त्यामुळे प्रशासनाने संबंधित मिठाईचा साठा जप्त करून नष्ट केला.

या आठ मिठाई सेंटरची झाली तपासणी

FDAच्या पथकांनी बुधवार पेठ परिसरातील खालील आठ आस्थापनांची तपासणी केली.

  1. मंगलमूर्ती पेढे
  2. श्रीमंत पेढेवाले
  3. श्री मंगल मूर्ती
  4. धारवाडी पेढे स्वीट्स अँड स्नॅक्स
  5. जय गणेश स्वीट सेंटर
  6. अथर्व स्वीट सेंटर
  7. हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्र
  8. श्री कृपा दुग्धालय

पुणे FDA मिठाई कारवाई

श्रीमंत पेढेवाले आणि श्री मंगल मूर्ती येथून सर्वाधिक मिठाई जप्त

कारवाईदरम्यान श्रीमंत पेढेवाले येथून २१५.१ किलो मिठाई जप्त करून नष्ट करण्यात आली. या मिठाईची किंमत १ लाख १८ हजार ८० रुपये होती. येथे मोतीचूर लाडू, खवा मोदक आणि उकडीचे मोदक यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

तर श्री मंगल मूर्ती येथून १९५ किलो मिठाई जप्त करण्यात आली. तिची किंमत १ लाख १७ हजार रुपये होती. येथे अस्वच्छता आढळण्याबरोबरच आवश्यक परवाना किंवा नोंदणी नसल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे या आस्थापनाला तातडीने व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली.

याशिवाय धारवाडी पेढे स्वीट्स अँड स्नॅक्स येथून ४३ किलो, जय गणेश स्वीट सेंटर येथून ३५ किलो आणि अथर्व स्वीट सेंटर येथून २४ किलो मिठाई जप्त करून नष्ट करण्यात आली.

दोन ठिकाणी परवाना किंवा नोंदणी नसल्याचे उघड

तपासणीदरम्यान श्री मंगल मूर्ती या आस्थापनाकडे आवश्यक विक्री परवाना नसल्याचे आढळले. तसेच हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्र हे नोंदणी प्रमाणपत्राशिवाय सुरू असल्याचे समोर आले. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मिठाईचे १७ नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी

या संपूर्ण कारवाईदरम्यान FDAच्या पथकांनी मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांचे एकूण १७ नमुने गोळा केले आहेत. त्यामध्ये मोतीचूर लाडू, खव्याचे मोदक, उकडीचे मोदक, बेसनाचे लाडू तसेच विविध दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

जप्त करण्यात आलेली मिठाई नाशवंत असल्याने ती जागेवरच नष्ट करण्यात आली. दरम्यान, मिठाई तयार करताना स्वच्छता राखणे, अन्नपदार्थांची योग्य साठवणूक करणे आणि आवश्यक परवाने घेणे बंधनकारक असल्याचे FDAने स्पष्ट केले आहे.

या कारवाईमुळे पुण्यातील मिठाई व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, सणासुदीच्या काळात मिठाई खरेदी करताना ग्राहकांनीही स्वच्छता आणि गुणवत्तेकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Pune News, Pune FDA Action, FDA Raid, मिठाई कारवाई, पुणे बातम्या, बुधवार पेठ, मिठाई दुकाने, तुकाराम मुंढे, अन्न व औषध प्रशासन, Food Safety, Maharashtra News, Breaking News, Lakshyavedh News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button