Breking Newsमहाराष्ट्र

सुरतकडे मजुरीसाठी निघालेल्या जळगावच्या कुटुंबाला गुजरातमध्ये कालव्यात फेकले; तिघांचा मृत्यू, दोन चिमुकले बेपत्ता

मजुरीसाठी सुरतकडे निघाले अन् वाटेतच काळाचा घाला! जळगावच्या कुटुंबाला गुजरातमध्ये कालव्यात फेकल्याचा आरोप; तिघांचा मृत्यू, दोन मुले बेपत्ता… १३ वर्षीय मुलाने पाईप पकडून वाचवला जीव!

सुरतकडे मजुरीसाठी निघालेल्या जळगावच्या कुटुंबाला गुजरातमध्ये कालव्यात फेकले; तिघांचा मृत्यू, दोन चिमुकले बेपत्ता

सुरत : मजुरीच्या कामासाठी जळगावहून सुरतकडे निघालेल्या एका कुटुंबावर गुजरातमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ चार जणांनी कुटुंबाची गाडी अडवून त्यांना वेगवेगळ्या वाहनांमध्ये बसवले आणि त्यानंतर उकाई-काकरापार डाव्या कालव्यात फेकल्याचा आरोप आहे. या घटनेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. तर १३ वर्षीय मुलाने पाईपचा आधार घेत आपला जीव वाचवला आणि त्याच्यामुळे संपूर्ण घटना उघडकीस आली.

जळगावच्या कुटुंबाला गुजरातमध्ये कालव्यात फेकले! तिघांचा मृत्यू, २ मुले बेपत्ता; १३ वर्षीय मुलगा बचावला

जळगावहून सुरतकडे निघाले होते कुटुंब

मूळचे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल परिसरातील रहिवासी असलेले नितीन उर्फ भुरिया पाटील (४५), त्यांची पत्नी कविता पाटील (३८) आणि चार अल्पवयीन मुले मजुरीच्या कामासाठी गुजरातमधील सुरतकडे निघाले होते.

२१ नोव्हेंबरच्या रात्री बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ त्यांच्या वाहनाला दुसऱ्या कारमधून आलेल्या चार जणांनी अडवल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या वाहनांमध्ये बसवण्यात आले.

कालव्याच्या दिशेने नेऊन सर्वांना पाण्यात फेकल्याचा आरोप

तक्रारीनुसार, कुटुंबातील सदस्यांना उकाई-काकरापार डाव्या कालव्याजवळ नेण्यात आले. त्यानंतर त्यांना कालव्यात फेकून देण्यात आल्याचा आरोप आहे.

कालव्यात पडलेल्या १३ वर्षीय करण पाटीलच्या हाताला पाईप लागला. त्याने पाईप पकडून काही काळ स्वतःचा जीव वाचवला आणि अखेर कालव्यातून बाहेर येण्यात यश मिळवले. त्यानंतर तो जवळच्या पेट्रोल पंपावर पोहोचला आणि तेथील कर्मचाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली.

नितीन पाटील, पत्नी कविता आणि मुलीचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने कालव्यात शोधमोहीम सुरू केली. महुवा तालुक्यातील डुंगरी गावाजवळील कालव्यातून नितीन पाटील, त्यांची पत्नी कविता आणि ९ वर्षीय स्वीटी यांचे मृतदेह सापडले.

दरम्यान, कुटुंबातील आणखी दोन मुले बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे. कालव्याचा प्रवाह पुढे नवसारी आणि जलालपोरच्या दिशेने जात असल्याने संबंधित भागातील पोलिसांनाही सतर्क करण्यात आले आहे.

चार संशयितांविरोधात गुन्हा

या प्रकरणी कुटुंबातील मोठी मुलगी खुशी हिने दिलेल्या तक्रारीवरून खंडियो, आभो, बंटी आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी अपहरण करून हत्या करण्याच्या उद्देशाने नेणे, खुनाचा प्रयत्न आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत.

कुटुंबाला लक्ष्य करण्यामागचं कारण काय?

संपूर्ण कुटुंबाला अशा प्रकारे लक्ष्य करण्यामागे नेमकं कारण काय होते? आरोपी आणि पीडित कुटुंबीयांमध्ये पूर्वीपासून काही संबंध किंवा वाद होता का? हा प्रकार पूर्वनियोजित होता का? यासह अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत.

या घटनेमागील नेमके कारण आणि हल्ल्याचा कट कोणी रचला, याचा तपास बारडोली पोलिसांकडून सुरू आहे. बेपत्ता मुलांचा शोध घेण्याबरोबरच आरोपींना अटक करण्यासाठीही पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button