पाथर्डी पोलीस ठाण्यात लाच प्रकरण उघड; हवालदार रंगेहाथ पकडला, शिपाई फरार

पाथर्डी( लक्ष्यवेध न्यूज ):-लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाथर्डी पोलीस ठाण्यात सापळा रचून पोलीस हवालदार अभयसिंह काकासाहेब लबडे याला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याची कारवाई बुधवारी (दि. २९ एप्रिल) सायंकाळी करण्यात आली. या कारवाईदरम्यान घेतलेली रक्कम त्याने सहकारी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर मारूती सानप याच्याकडे दिल्यानंतर सानप हा पळून जाण्यात यशस्वी झाला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या पथकाने ही कारवाई केली. एका नागरिकाकडून वाहन सोडवून देणे व दाखल गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात ७ हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार पथकाने पडताळणी करून सापळा रचला.
तडजोडीनंतर ५ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्यानंतर पाथर्डी पोलीस ठाण्यातच कारवाई करण्यात आली. पंचांच्या उपस्थितीत अँथ्रासिन पावडर लावलेल्या नोटा देण्यात आल्या. त्या नोटा हवालदार लबडे यांनी स्वीकारल्या; मात्र संशय आल्याने त्यांनी ती रक्कम शिपाई सानप याच्याकडे दिल्याचे समोर आले.पथकाने धाड टाकताच शिपाई सानप हा मागील दरवाजातून पळून गेला. त्याचा पाठलाग करूनही तो पसार झाला. दरम्यान, अँथ्रासिन चाचणीत हवालदार लबडे यांच्या हातांवर व कपड्यांवर लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी पोलीस हवालदार अभयसिंह काकासाहेब लबडे व पोलीस शिपाई ज्ञानेश्वर मारूती सानप यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम मधील कलम व तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, अटक करण्यात आलेल्या हवालदार लबडे याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, फरार शिपाई सानप याचा शोध सुरू आहे.



