Breking News

खुनाच्या प्रयत्नातील दोन फरार आरोपी पुण्यातून जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात

पाथर्डी( लक्ष्यवेध न्यूज)  :- खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून शिताफीने जेरबंद केले. सिंहगड परिसरात लपून बसलेल्या या आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पाथर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, २७ मार्च २०२६ रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास ‘थोडे बाजूला व्हा, पलीकडे जाऊ द्या’ असे फिर्यादीने म्हटल्याच्या किरकोळ कारणावरून आरोपी अंकुश रामा शिरसाठ याने संतापाच्या भरात मंगेश शिरसाठ, आदित्य शिरसाठ, बाळासाहेब रामा शिरसाठ, लक्ष्मण शिरसाठ व संदीप शिरसाठ यांना बोलावून घेतले. त्यानंतर या सर्वांनी संगनमताने फिर्यादीवर धारदार शस्त्र, लोखंडी गज, लाकडी दांडके तसेच लाथाबुक्क्यांनी हल्ला करत गंभीर दुखापत केली.

या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना केले होते. तपासादरम्यान आरोपी पुण्यातील सिंहगड परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने जाधवनगर, वडगाव (पुणे) येथे सापळा रचला.

यावेळी संशयास्पदरीत्या फिरताना आढळलेल्या दोन युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे आदित्य अंकुश शिरसाठ (वय २२) आणि मंगेश अंकुश शिरसाठ (वय २०, दोघे रा. शिरसाठवाडी, ता. पाथर्डी) अशी सांगितली. चौकशीत त्यांनी गुन्ह्यात सहभागाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईबद्दल जिल्ह्यात समाधान व्यक्त होत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button