राजकीय

संगमनेर 2.0 उपक्रमावर प्रश्नचिन्ह!

निवडणुकीच्या तोंडावर संवादाची आठवण का? नागरिकांचा थेट सवाल

संगमनेर ः  शहरातील आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, याच दरम्यान आमदार सत्यजीत तांबे यांनी ‘संगमनेर 2.0’ हा नवा उपक्रम सुरू केल्याची घोषणा केली आहे. शहरातील नागरिक, विविध संस्था, मंडळे आणि क्षेत्रनिहाय प्रतिनिधींशी थेट संवाद साधून शहराच्या विकासाचा रोडमॅप तयार करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पण या उपक्रमावर आता अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, नागरिकांनीच तांबे यांच्यावर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील नागरिक वाहतूक कोंडी, अस्वच्छता, रस्त्यांची दुरवस्था, पाणीटंचाई, नाले-गटारांची समस्या, आरोग्य सुविधा, वाढते कर यांसह अनेक स्थानिक प्रश्नांनी त्रस्त आहेत. मात्र या काळात आमदार तांबे यांनी एकदाही अशा समस्या सोडविण्यासाठी सर्वसामान्यांसोबत थेट संवाद साधला नाही, असा स्पष्ट आरोप करत आता नागरिक “आता अचानक संवादाची आठवण कशी झाली?” असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठीच ‘संगमनेर 2.0’ हा उपक्रम सुरू केल्याचा आरोप देखील अनेक स्थानिक कार्यकर्ते व नागरिक करीत आहेत. शहरातील अनेक नागरिकांचे म्हणणे आहे की, “ज्यांना पाच वर्षे आमच्या समस्या दिसल्या नाहीत, त्यांना आता निवडणुका जवळ आल्या म्हणून संवाद आठवतोय.”

संगमनेर शहर झपाट्याने वाढत असताना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अनेक प्रश्न अधिक गंभीर होत गेले, मात्र त्यावर आमदारांनी सातत्याने आवाज उठवला नाही, अशी नाराजी आहे. काही वार्डांमध्ये प्रलंबित प्रकल्प, पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण समस्या आणि नव्या विकास आराखड्यावरील गोंधळ या विषयांवर नागरिकांनी वारंवार निवेदन दिले होते. पण त्यावर ठोस कार्यवाही दिसली नसल्यामुळे तांबे यांच्या नव्या उपक्रमाबाबत अविश्वासाची भावना प्रकर्षाने दिसत आहे.

दुसरीकडे ‘संगमनेर 2.0’ उपक्रम हा शहराला आधुनिक, नियोजनबद्ध आणि सर्वसमावेशक बनविण्यासाठीचा प्रयत्न असल्याचे तांबे समर्थकांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग घेऊन शहराचा भविष्यातील विकास आराखडा तयार करणे ही काळाची गरज असून निवडणूक हा याच्याशी संबंधित नसल्याचा दावा केला जात आहे.

परंतु सर्वसामान्य नागरिक आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे मत वेगळे आहे. त्यांच्यामते हा उपक्रम हा केवळ निवडणुकीपूर्वीचा राजकीय डाव असून, संवादाचा कार्यक्रम संपल्यानंतरही प्रत्यक्ष कृती दिसेल का? हे पाहणे महत्वाचे ठरेल. शहरातील युवावर्ग, व्यापारी, महिला वर्ग व वंचित घटकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर ठोस निर्णय किती घेतले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संगमनेरमध्ये सध्या निवडणुकीचे वातावरण तापले आहे आणि अशा परिस्थितीत आमदार तांबे यांचा उपक्रम नागरिकांना कितपत पटतो, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. पण एक मात्र खरे—शहरातील नागरिकांनी आता जागरूकता दाखवत स्पष्ट आणि ठाम प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे, ही लोकशाहीसाठी नक्कीच सकारात्मक बाब आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button