जिल्हा नेतृत्वाच्या निष्क्रियतेमुळे नाराजी
निक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिकच रंगतदार होणार

अहिल्यानगर ः जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी जोर धरत असताना, तालुक्यांमध्ये राजकीय हालचालींनी मोठी चढाओढ निर्माण केली आहे. पक्षांचे स्थानिक पातळीवरील गट–तट, उमेदवारांची चाचपणी, गुप्त बैठका आणि तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता, या सगळ्यांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिकच रंगतदार होणार आहेत.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आजी-माजी आमदारांनी थेट मैदानात उतरून प्रतिष्ठेची लढत उभी केली आहे. प्रत्येक तालुक्यात आपल्या गटातील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जिंकावा, यासाठी हे नेते प्रचंड प्रयत्न करत आहेत. यामुळे स्थानिक स्तरावर राजकीय दडपण वाढले असून, इतर पक्ष आणि गटांच्या गणितांमध्ये मोठे बदल दिसत आहेत.
याउलट, ‘जिल्ह्याचे नेते’ म्हणून स्वतःची छबी तयार करणारे काही वरिष्ठ नेते मात्र आश्चर्यकारकपणे शांत आहेत. पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, हे नेते केवळ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर लक्ष केंद्रित करत आहेत, तर नगरसेवक पदांच्या निवडणुकीबाबत ते पूर्णपणे उदासीन आहेत.
नगराध्यक्ष पद महत्वाचे असले तरी नगरसेवक हेच पुढील पाच वर्षे शहराची दिशा ठरवतात. मात्र, वरिष्ठ नेत्यांचे नगरसेवक निवडणुकीतील अनास्था आणि निष्क्रियता यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर वाढत आहे.
स्थानिक राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे की जिल्ह्यातील काही नेते फक्त प्रतिष्ठेच्या पदांवर लक्ष ठेवतात. नगराध्यक्ष जिंकला की यश मिळाल्याची भावना व्यक्त करतात; पण नगरसेवकांचा पराभव झाला तर त्याची जबाबदारी मात्र घेत नाहीत.”
अनेक तालुक्यांत नगराध्यक्ष पदासाठी अनेक दावेदार असताना, नगरसेवकांच्या जागांवर समन्वयाचा पूर्ण अभाव आहे. यामुळे एकाच पक्षातील दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला असून, अंतर्गत कलह बाहेर येत आहे. जिल्ह्यातील विविध नगरपंचायतींमध्ये कार्यकर्ते उघडपणे सांगू लागले आहेत की जिल्हा नेतृत्व फक्त मोठ्या पदांवर लक्ष ठेवते. तळागाळातील कार्यकर्त्यांकडे ना लक्ष, ना पाठबळ.” त्यामुळे निवडणुकांमध्ये पक्षविरोधी मतदानाची शक्यता वाढल्याचा अंदाज काही राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत स्थानिक आमदारांचे सक्रिय राजकारण, नेत्यांचे मौन, नगरसेवक पदांकडे दुर्लक्ष आणि वाढते गट–तट ही सर्व समीकरणे परिणामकारक ठरणार आहेत.
या पार्श्वभूमीवर, जिल्ह्याचे नेतृत्व नेमकी कोणती भूमिका घेते, तळागाळातील नाराजी कशी दूर करते, आणि पक्षातील समन्वय कसा राखते, हे आगामी राजकीय वातावरणावर निर्णायक ठरणार आहे.



