रात्रीच्या ड्रोनने राहुरी तालुक्यात दहशत चोरीपूर्वी आकाशात घिरट्या?; नागरिक भयभीत, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे अँटी ड्रोन कारवाईचे आदेश; पोलिस गस्त वाढविण्याच्या सूचना

देवळाली प्रवरा (लक्ष्यवेध न्यूज):- राहुरी तालुका आणि परिसरात रात्रीच्या वेळी आकाशात संशयास्पदरीत्या घिरट्या घालणाऱ्या अवैध ड्रोनमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हे ड्रोन दिसत असल्याच्या चर्चेमुळे ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली असून, प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक गावांमध्ये रात्री अपरात्री ड्रोन फिरताना दिसत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. काही ठिकाणी चोरीच्या घटनांपूर्वी आकाशात ड्रोन दिसल्याचेही ग्रामस्थ सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी गावांमध्ये सतर्कता वाढविण्यात आली आहे.
दरम्यान, राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी नागरिकांना केलेल्या आवाहनात या ड्रोनबाबत पोलीस प्रशासन किंवा तहसील प्रशासनाकडे कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे ड्रोन नेमके कोण उडवत आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित पाटील कदम तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा पोलीस अधीक्षक ममक्का सुदर्शन यांची संयुक्त भेट घेत निवेदन सादर केले. निवेदनात राहुरी तालुक्यात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोनमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले. चोरीच्या घटनांपूर्वी ड्रोन दिसल्याच्या चर्चांमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी चिंता पसरल्याचेही त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
या निवेदनाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पोलीस प्रशासनाला तत्काळ कारवाईचे निर्देश दिले. अँटी ड्रोन यंत्रणेच्या माध्यमातून अवैध ड्रोनचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने अवैध ड्रोन उड्डाणांविरोधात कठोर भूमिका घेतल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे. संशयास्पद ड्रोन अथवा हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे
“ड्रोन दिसताच पोलिसांना कळवा”
रात्रीच्या वेळी गावांच्या परिसरात संशयास्पद ड्रोन अथवा अनोळखी हालचाली दिसल्यास नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



