Breking News

महावितरणविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या दोषी अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; जॉइंट एमडींसमोर संतप्त आंदोलन

अहिल्यानगर( लक्ष्यवेध न्यूज ) :- स्टेशन रोडवरील आनंदनगर येथे विजेच्या खांबाला शॉक लागून अवघ्या साडेतीन वर्षीय प्रीती गांगर्डे हिचा मृत्यू झाल्यानंतर महावितरणच्या कथित निष्काळजीपणाविरोधात संताप उसळला आहे. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

आंदोलनावेळी महावितरणचे जॉइंट एमडी दिलीप जगदाळे, नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे आणि अधीक्षक अभियंता विजयकुमार पवार यांच्यासमोर आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शहरातील धोकादायक वीज खांब, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा आणि प्रलंबित तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने विशेष मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले, “ही दुर्घटना नसून कथित प्रशासकीय हलगर्जीपणाचा बळी आहे. संबंधित कुटुंबीयांनी वारंवार तक्रारी करूनही महावितरणने कोणतीही प्रभावी कारवाई केली नाही. वेळेत दखल घेतली असती तर निष्पाप चिमुरडीचा जीव वाचला असता. दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई झालीच पाहिजे.”

ते म्हणाले, “ही लढाई केवळ एका कुटुंबासाठी नाही, तर शहरातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी आहे. महावितरण नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असेल, तर अशा घटना पुन्हा घडू शकतात. दोषींना शिक्षा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील.”

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनीही महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “संपूर्ण यंत्रणा ठेकेदारांच्या भरोशावर चालत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याच निष्काळजीपणामुळे एका निष्पाप बालिकेचा जीव गेला. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलनात भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक महेश तवले, बाळासाहेब पवार, प्रकाश भागानगरे, मयूर बांगरे, दत्ता गाडळकर, अजिंक्य बोरकर, संभाजी पवार, सागर गुंजाळ, अभिजित काळे, जॉय लोखंडे, रवी दंडी, दीपक खेडकर, ऋषिकेश ताठे, सुमित लोंढे, सुरज कोतकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुर्घटनेची पूर्वसूचना; तरीही कारवाई नाही?

आनंदनगर परिसरातील नागरिकांनी २१ ऑगस्ट २०२५ रोजी महावितरणकडे संबंधित वीज खांब धोकादायक अवस्थेत असल्याची लेखी तक्रार दिल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. या निवेदनात “नवीन खांब उभारला नाही तर कधीही जीवितहानी होऊ शकते,” असा स्पष्ट इशारा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या तक्रारीची दखल न घेतल्यामुळेच प्रीती गांगर्डे हिचा बळी गेल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, तसेच शहरातील सर्व धोकादायक वीज खांब व विद्युत यंत्रणेचे विशेष सुरक्षा ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button