अहिल्यानगर काँग्रेसमध्ये ‘तीन जिल्हाध्यक्ष’ फॉर्म्युला; फेरबदलाच्या घोषणेनंतरही जुन्यांनाच संधी

अहिल्यानगर( लक्ष्यवेध न्यूज):- संघटनात्मक फेरबदल आणि नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या घोषणांनंतर अखेर काँग्रेस पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली. मात्र या बदलांमध्ये मोठ्या प्रमाणात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याऐवजी जुन्याच नेतृत्वावर विश्वास दाखविल्याचे चित्र समोर आले आहे. शहर जिल्हाध्यक्षपदी दीप चव्हाण, उत्तर जिल्हाध्यक्षपदी सचिन गुजर आणि दक्षिण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या. जिल्ह्याचा वाढता भौगोलिक विस्तार आणि संघटनात्मक कामकाज सुलभ करण्यासाठी काँग्रेसनेही अखेर ‘विभाजित जिल्हाध्यक्ष’ पद्धती स्वीकारली आहे. यापूर्वी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट तसेच शिवसेनेचे शिंदे व ठाकरे गट यांनीही जिल्ह्यात तीन ते चार जिल्हाध्यक्षांची रचना अमलात आणली होती.
मात्र काँग्रेसने ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत नव्या नेतृत्वाला संधी देण्याचे संकेत दिले असतानाही प्रत्यक्षात दोन जुन्या चेहऱ्यांवरच पुन्हा विश्वास दाखविण्यात आला. दीप चव्हाण हे यापूर्वीही शहर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते, तर सचिन गुजर यांच्याकडे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची प्रभारी जबाबदारी होती. आता त्यांनाच उत्तर जिल्हाध्यक्ष म्हणून कायम करण्यात आले आहे. केवळ किरण पाटील यांची नवीन नियुक्ती झाल्याचे मानले जात आहे.
विशेष म्हणजे नियुक्त करण्यात आलेले तिन्ही पदाधिकारी हे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय आणि कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे या नियुक्त्यांमधून थोरात गटाचे जिल्ह्यातील वर्चस्व कायम असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
काँग्रेसने महाराष्ट्रभर ‘संघटन सृजन अभियान’ राबविताना संघटनेला नवा चेहरा देण्याची भूमिका घेतली होती. जिल्हा दौऱ्यावर आलेले पक्ष निरीक्षक तथा ओडिशाचे माजीमंत्री शंकर राऊत यांनीही संघटनात्मक फेरबदलांचे संकेत दिले होते. मात्र प्रत्यक्ष नियुक्त्यांमध्ये अपेक्षित बदल न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, २०१४ नंतर जिल्ह्यात काँग्रेसची संघटना सातत्याने कमकुवत होत गेल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या नगर महापालिका निवडणुकीत पक्षाची कामगिरी निराशाजनक राहिली. मात्र श्रीरामपूर नगरपालिकेत सत्ता मिळविण्यात सचिन गुजर यांना यश आले होते. त्यांनी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष आणि जिल्हा कार्याध्यक्ष अशी विविध पदे सांभाळली आहेत.
शहर काँग्रेसमध्येही नेतृत्वाचे बदलते चित्र पाहायला मिळाले. २०१४ ते २०१९ या काळात दीप चव्हाण शहर जिल्हाध्यक्ष होते. त्यानंतर किरण काळे यांची नियुक्ती झाली होती; मात्र त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर २०२५ मध्ये पुन्हा दीप चव्हाण यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात आली होती. आता त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविण्यात आला आहे.
काँग्रेसच्या या नव्या संघटनात्मक रचनेमुळे जिल्ह्यात पक्षाला नवी ऊर्जा मिळणार की जुन्याच नेतृत्वाभोवती संघटना फिरत राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



