नीट पेपरफुटीविरोधात मुंबई पोलिसांची व्हॅन एकहाती अडवणारी धाडसी तरुणीचे होतेय कौतुक

मुंबई ( लक्ष्यवेध न्यूज ):-मुसळधार पाऊस आणि तणावपूर्ण वातावरण अशा अस्वस्थ परिस्थितीत एका तरुणीने स्वतःचा जीव धोक्यात घालून मुंबई पोलीस दलाची गाडी रोखून धरली. सध्या सोशल मीडियावर याच अंगावर काटा आणणाऱ्या प्रसंगाची सर्वाधिक चर्चा आहे.
देशाची राजधानी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर नीट परीक्षा आणि पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांचा आक्रोश सुरू आहे. या असंतोषाचे पडसाद आता देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरातही उमटले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी आणि विविध विद्यार्थी संघटनांनी २२ जुलै रोजी निदर्शने केली. याच आंदोलनादरम्यान एक निडर तरुणी अचानक प्रकाशझोतात आली.
दादर परिसरातील ऐतिहासिक शिवाजी पार्क येथे विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात शांततेत निदर्शने करण्यास सुरुवात केली होती. मात्र, काही वेळातच मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आंदोलक तरुणांची धरपकड सुरू केली. ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना आणि काही महिलांना एका व्हॅनमध्ये अक्षरशः कोंबण्यात आले होते. ही संपूर्ण परिस्थिती पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या एका तरुणीचा संयम सुटला. तिने कसलाही मागचापुढचा विचार न करता थेट पोलिसांच्या त्या मोठ्या व्हॅनसमोर धाव घेतली. गाडी चालू असतानाही तिने एका हाताने व्हॅनला थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करूनही ती जागची हलली नाही. अखेर पोलिसांना माघार घ्यावी लागली आणि काही आंदोलकांना सोडण्यात आले.
पोलिसांना नडणाऱ्या या रणरागिणीचे नाव रिया अहिर (जिची ओळख रिया यादव अशीही आहे) असे आहे. २७ वर्षीय रिया अहिर ही मूळची मॉडेल आणि अभिनेत्री आहे. यासोबतच ती एक यशस्वी उद्योजिका असून रियासत नावाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड चालवते. ‘दिलबरा’ या प्रसिद्ध म्युझिक अल्बममध्ये ती यापूर्वी झळकली आहे. विशेष म्हणजे रियाच्या कुटुंबाला लष्करी सेवेची मोठी पार्श्वभूमी आहे. तिचे वडील इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात कार्यरत होते. “माझ्या अंगावरून गाडी गेली असती, तरी मला त्याची पर्वा नव्हती. असहाय्य होऊन जगण्यापेक्षा मला शहीद व्हायला नक्कीच आवडले असते,” अशी रोखठोक आणि निर्भय प्रतिक्रिया तिने नंतर प्रसारमाध्यमांना दिली. पालकांकडून मिळालेल्या संस्कारांमुळेच ही हिंमत आल्याचे ती अभिमानाने सांगते. ती स्वतः मुंबई विद्यापीठ येथून दूरस्थ शिक्षणाद्वारे इंग्रजी साहित्याचे शिक्षण घेत असून, शिक्षण व्यवस्थेतील भोंगळ कारभाराचा तिलाही फटका बसला आहे.
रिया अहिर हिच्या या धाडसाचे कौतुक फक्त सर्वसामान्यांकडूनच होत नाही, तर बॉलिवूडमधील दिग्गजांनीही तिला दाद दिली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर तिचा फोटो शेअर करत या धैर्याला सलाम केला आहे. देशातील अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी एकटीने उभे राहण्याची तिची ही कृती सध्या तरुणाईसाठी एक मोठे प्रेरणास्थान बनली आहे.



