Breking News

कायद्याचा धाक संपलाय, तातडीने कठोर कारवाई करा – राज ठाकरे

मुंबई( लक्ष्यवेध न्यूज ):-पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या अमानुष प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी संतप्त शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी या घटनेचा निषेध करत, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच अशा प्रकारच्या घटनांमध्ये सरकारने केवळ आश्वासन न देता ठोस आणि तातडीची कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, अशा प्रकारच्या गुन्ह्यांनंतर सरकार फास्ट ट्रॅक, कारवाईची भाषा करते, मात्र त्याचा नेमका अर्थ काय, हे स्पष्ट होत नाही. प्रत्येक वेळी घटना घडल्यावरच प्रशासन जागं होतं, ही बाब चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यात महिलांवरील अत्याचार, अपहरण आणि शोषणाच्या घटना सातत्याने वाढत आहेत, हे वास्तव गंभीर असून कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

नसरापूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आंदोलन केल्याची माहिती समोर आली होती. या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या बातम्यांवरही राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, आंदोलकांवर कारवाई करण्यात सरकार तत्परता दाखवते, मात्र गुन्हेगारांवर तितकीच कठोर कारवाई का होत नाही? हा दुहेरी निकष थांबवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी व्यापक सामाजिक चिंतनाची गरज व्यक्त केली. महाराष्ट्र हे स्त्री शिक्षण आणि सक्षमीकरणाचा पाया घालणारे राज्य आहे, तरीही अशा घटना वारंवार का घडत आहेत, याचा गंभीरपणे विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा घटना घडल्यानंतर काही दिवस संताप व्यक्त होतो, पण त्यानंतर सगळं विसरलं जातं, ही प्रवृत्ती धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज ठाकरे यांनी समाजातील बदलत्या प्रवृत्तींकडेही लक्ष वेधले. त्यांच्या मते, सत्तेची हव्यास, पैशाची लालसा, आणि समाजातील नियंत्रण कमी होणे यामुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. पूर्वी समाजात एकमेकांवर लक्ष ठेवण्याची आणि चुकीच्या वर्तनावर अंकुश ठेवण्याची पद्धत होती, मात्र आता ती कमी झाली आहे. त्यामुळे चुकीच्या प्रवृत्ती वाढीस लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय त्यांनी उदारीकरणानंतरच्या सामाजिक बदलांवरही भाष्य केले. आर्थिक बदलांनी अनेक संधी दिल्या, पण त्याचबरोबर मूल्यव्यवस्थेचा ऱ्हास झाला, असे त्यांनी सांगितले. आजची परिस्थिती पाहता समाज, माध्यमे आणि राजकारणी यांनी जबाबदारीने वागणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे सांगत, महाराष्ट्राचं विचलित झालेलं लक्ष आणि भरकटलेलं लक्ष्य पुन्हा मार्गावर आणण्याची वेळ आली आहे, असा ठाम संदेश त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button