‘अपने अपने राम’ कथेने शहर राममय; तीन दिवसांत ७५ हजार भाविकांची उपस्थिती

अहिल्यानगर (लक्ष्यवेध न्यूज):- येथे स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त काका ट्रस्ट व जगताप परिवारातर्फे आयोजित ‘अपने अपने राम’ या रामकथेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात सुमारे ७५ हजार भाविकांनी उपस्थिती लावत शहरात राममय वातावरण निर्माण झाले.
प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांनी सादर केलेल्या रामकथेत पारंपरिक कथनाऐवजी रामायणातील प्रसंगांचे आधुनिक जीवनाशी साधर्म्य स्पष्ट करत भाविकांना मंत्रमुग्ध केले. भजन, कीर्तन आणि जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला.
या सोहळ्यासाठी सुमारे एक लाख चौरस फूट क्षेत्रात भव्य मंडप उभारण्यात आला होता. बसण्याची व्यवस्था, पंखे, कुलर, एलईडी स्क्रीन, ज्येष्ठ नागरिकांसाठी ई-रिक्षा, स्वच्छतागृहे यांसह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तीनही दिवस भाविकांना महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व बाउन्सर तैनात करण्यात आले होते.
समारोप प्रसंगी आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांच्या प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुढील वर्षी ही रामकथा पंधरा दिवसांची आयोजित करण्याचा संकल्प जाहीर केला. शहराच्या विकासासोबत अध्यात्मिक उपक्रमांवरही भर देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शहरात विकास आणि धार्मिक उपक्रमांमुळे होत असलेल्या सकारात्मक बदलांचे कौतुक केले. अहिल्यानगरला देशातील अग्रगण्य शहर बनविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, शहरात मोठ्या औद्योगिक गुंतवणुकीसाठी प्रयत्न सुरू असून रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राजेश भंडारी, विकी जगताप, अनिल मुरकुटे, अनुप काळे, अजित जगताप, गणेश गोंडाळ, शशीकांत घीगे आदींनी नियोजन केले.



