Breking Newsआरोग्यमहाराष्ट्र

दात कोरताना सेफ्टी पिन थेट अन्ननलिकेत अडकली अन्… जळगावमध्ये १८ वर्षीय तरुणीसोबत धक्कादायक घटना

जळगावमध्ये दात कोरताना १८ वर्षीय तरुणीने चुकून सेफ्टी पिन गिळली. पिन अन्ननलिकेत अडकली; शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून पिन बाहेर काढली.

दात कोरताना सेफ्टी पिन थेट अन्ननलिकेत अडकली अन्… जळगावमध्ये १८ वर्षीय तरुणीसोबत धक्कादायक घटना

जळगाव : जेवण झाल्यानंतर दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी अनेकजण हातात मिळेल त्या वस्तूचा वापर करतात. मात्र, ही सवय किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय जळगावमधील एका घटनेतून आला आहे. दात कोरण्यासाठी सेफ्टी पिनचा वापर करणाऱ्या १८ वर्षीय तरुणीने चुकून ती पिन गिळली. ही टोकदार पिन थेट अन्ननलिकेत अडकल्याने तरुणीच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून पिन बाहेर काढली.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमधील १८ वर्षीय तरुणी जेवणानंतर दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी सेफ्टी पिनचा वापर करत होती. याचवेळी अचानक तिच्याकडून पिन गिळली गेली. ही पिन थेट अन्ननलिकेत जाऊन अडकली. टोकदार वस्तू अन्ननलिकेत अडकल्याने तरुणीला त्रास होऊ लागला. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांसमोर मोठे आव्हान

तरुणीच्या अन्ननलिकेत अडकलेली सेफ्टी पिन अत्यंत टोकदार होती. ती बाहेर काढताना अन्ननलिकेला छिद्र पडणे, गंभीर रक्तस्राव होणे किंवा पिन श्वसनमार्गात जाणे अशा गंभीर गुंतागुंतींचा धोका होता. त्यामुळे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.

मात्र, रुग्णालयाच्या कान, नाक व घसा विभागातील डॉक्टरांनी अत्यंत सावधगिरीने वैद्यकीय प्रक्रिया पार पाडली आणि अन्ननलिकेत अडकलेली सेफ्टी पिन यशस्वीरीत्या बाहेर काढली. त्यामुळे तरुणीला मोठा दिलासा मिळाला.

डॉक्टरांच्या पथकाला यश

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ही उपचार प्रक्रिया पार पडली. कान, नाक व घसा विभागप्रमुख डॉ. राजश्री चौरपगार, डॉ. अक्षय सरोदे, डॉ. ललित राणे यांच्यासह निवासी डॉक्टरांच्या पथकाने या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावली. भूलशास्त्र विभाग आणि परिचारिका कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभले.

दात कोरताना टोकदार वस्तू वापरू नका!

या घटनेनंतर डॉक्टरांनी नागरिकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी सेफ्टी पिन, सुई, खिळे किंवा इतर टोकदार वस्तूंचा वापर करू नये. त्याऐवजी डेंटल फ्लॉस किंवा योग्य इंटरडेंटल ब्रशचा वापर करावा.

चुकून एखादी टोकदार वस्तू गिळली गेल्यास घरगुती उपाय करण्याऐवजी तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहनही डॉक्टरांनी केले आहे.

जळगावमधील या घटनेमुळे दात स्वच्छ करण्याची साधी वाटणारी सवयही किती धोकादायक ठरू शकते, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button