तुषार जाधव यांना कृषी विस्तार कार्य सन्मान’ पुरस्कार
कोल्हार बुद्रुक गावाच्या नावात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला

नाशिक : राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक गावाच्या नावात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. येथील तुषार विलास जाधव यांना ‘कृषीथॉन २०२५’ या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात ‘प्रयोगशील कृषी विस्तार कार्य सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
आधुनिक शेतीत युवकांचा सहभाग वाढवणे आणि प्रयोगशील कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे हा कृषीथॉनचा उद्देश असून, तुषार जाधव यांनी कृषी विस्तार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. ते कृषक गटाचे सक्रिय सदस्य असून गटाचे शेती सल्लागार म्हणून त्यांनी अनेक शेतकऱ्यांना आधुनिक, वैज्ञानिक आणि प्रयोगशील शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन केले आहे.
त्यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे उत्पादनक्षमता, पीक व्यवस्थापन, स्मार्ट शेतीचा वापर आणि बाजारपेठेतील सहभाग यात शेतकऱ्यांची लक्षणीय प्रगती झाली. या नाविन्यपूर्ण कार्यामुळे कृषीथॉनच्या निवड समितीने त्यांची निवड केली.
नाशिक येथे झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते तुषार जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत हा सन्मान त्यांच्या प्रयोगशील आणि प्रभावी कृषी विस्तार कार्याची पावती असल्याचे नमूद केले.
या वेळी विखे पाटील कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर पाटील, खर्डे गटाचे सचिव विनोद राऊत, गटाचे सदस्य भागवत शेळके, सुभाष शेळके, संजय राऊत, दत्तात्रय शेळके, वैभव भणगे, पंचायत समिती सदस्य भरत अंत्रे तसेच अन्य सदस्य उपस्थित होते.


