मुंबई शिवसेनेची धुरा आता सचिन अहिरांच्या हाती? एकनाथ शिंदेंची नवी खेळी

मुंबई( लक्ष्यवेध न्यूज ):–राज्यामध्ये सध्या कोणत्याही निवडणुकांचे वारे वाहत नसले तरी राजकीय वर्तुळात संघटनात्मक बांधणीचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने आता एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी नवी रणनीती आखल्याचे चित्र आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून मुंबईतील शिवसेनेची धुरा आता विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्याकडे सोपवली जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीतून या राजकीय बदलांचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
गेल्या काही काळापासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची न्यायालयीन लढाई निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदेंकडे असले तरी, नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच पसंती दिल्याचे स्पष्ट झाले. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी एकनाथ शिंदे आता पक्षात खांदेपालट करण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी मुंबईतील पक्ष संघटनेची जबाबदारी माजी खासदार राहुल शेवाळे यांच्याकडे होती, मात्र अपेक्षित यश न आल्याने आता ही जबाबदारी सचिन अहिर यांच्यावर सोपवण्याच्या हालचालींना वेग आला.
अलीकडेच ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांनी अधिवेशनापूर्वीच विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर आता थेट मुंबईतील पक्ष संघटनेची सूत्रे त्यांच्याकडे दिली जाणार असल्याची चर्चा आहे. याची प्रचिती आजच्या बैठकीत आली, जिथे शिवसेना नगरसेवकांनी सचिन अहिर यांची भेट घेतली. विधिमंडळ कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत अहिरांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले. या महत्त्वाच्या बैठकीला शिवसेना गटनेते अमेय घोले, उपमहापौर संजय घाडी, सरचिटणीस राहुल शेवाळे, सचिव संजय मोरे आणि अनेक नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
या बैठकीसंदर्भात माहिती देताना शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी सांगितले की, ही बैठक केवळ विकासकामांवर चर्चा करण्यासाठी होती. त्यांनी स्पष्ट केले की, सर्व नेत्यांवर सामूहिक जबाबदारी आहे आणि येत्या १५ ऑगस्टनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार शिवसेनेच्या बैठका आयोजित केल्या जातील. तसेच, आयुक्तांबाबत काही तक्रारी असल्याने या भेटीत त्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले. दुसरीकडे, उपमहापौर संजय घाडी यांनी सांगितले की, सचिन अहिर यांनी नगरसेवकांना चहापानासाठी बोलावले होते आणि यादरम्यान त्यांनी प्रत्येकाच्या प्रभागातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. येत्या काळात सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील शिवसेनेच्या संघटनात्मक समीकरणात नक्की काय बदल होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सद्यस्थितीत निवडणुका नसल्या तरी एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय मुंबईत शिवसेनेचे अस्तित्व अधिक मजबूत करण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.



