अंतर्गत नाराजीनं नेवाशात युतीच्या पॅनलला धोका
नगराध्यक्ष पदासाठी डॉ. करणसिंह घुले यांना उमेदवारी जाहीर

नेवासा : नेवासा नगरपंचायत निवडणुकीत भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीने आपला अधिकृत पॅनल उभा केला असून नगराध्यक्ष पदासाठी डॉ. करणसिंह घुले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र पॅनल जाहीर होताच युतीमध्ये अंतर्गत नाराजीचे पडसाद उमटू लागले असून या नाराजीचा पॅनलला मोठा फटका बसू शकतो, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
पॅनल ठरविताना अनेक अनुभवी स्थानिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले, काही गटांचे मत न घेता यादी अंतिम केल्याचा आरोप कार्यकर्ते आता उघडपणे करत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे निवडणूक रणधुमाळीच्या सुरुवातीलाच युतीसमोर आतल्या घरातील असंतोषाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
युतीतील ज्येष्ठ नेते आमदार विठ्ठलराव लंघे हे नाराज गटाची समजूत काढण्यासाठी हालचाली करत आहेत. मात्र नाराज कार्यकर्ते अद्याप शांत न झाल्याने ते “छुप्प्या युद्धा”तून विरोधकांना मदत करीत असल्याचा आरोप युतीच्या मंडळीतूनच ऐकू येत आहे.
स्थानिक राजकीय वर्तुळात यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, अधिकृत पॅनलला होणाऱ्या संभाव्य नुकसानीबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
युतीसमोर कठीण समीकरणे
डॉ. करणसिंह घुले यांच्या नावाभोवती नेतृत्वाचे एकत्रीकरण करण्याचा युतीचा प्रयत्न असला तरी अंतर्गत मतभेद न सुटल्यास निवडणुकीत अडचणी निर्माण होऊ शकतात, असे जाणकारांचे मत आहे.
पॅनल जाहीर झाल्यानंतर लगेचच नाराजीचे सूर ऐकू येणे हा युतीसाठी इशारा मानला जात आहे.
नाराज कार्यकर्त्यांना हाताशी धरून ठेवणे आणि पॅनलबाबत ऐक्य निर्माण करणे, हे युतीला निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी अत्यावश्यक ठरणार आहे.
युती नेते स्थिती कितपत सावरणार, आणि नाराजांचे मन वळविणार यावरच आगामी लढतीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.



