कोल्हारच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शैक्षणिक सेवेचा गौरव शेख शब्बीर यांना सेवापूर्ती सोहळ्यात सन्मानपूर्वक निरोप ३१ हजारांच्या देणगीतून शेख सरांनी जपली विद्यालयाप्रती कृतज्ञता!

कोल्हार बु.( लक्ष्यवेद न्यूज):- रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (कला), कोल्हार बुद्रुक येथे तब्बल ३० वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर सेवानिवृत्त होत असलेले शिक्षक शब्बीर बशीर शेख सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. आपल्या सेवाकाळात ज्या विद्यालयाने आपल्याला कार्य करण्याची संधी दिली, त्या विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करत शेख सर यांनी विद्यालयास ३१ हजार रुपयांची देणगी प्रदान केली. त्यांच्या या दातृत्वाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अधिकारी श्री. नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. प्रमोद तोरणे, श्री. भाऊसाहेब शिरसाठ, तर विशेष अतिथी म्हणून ढोरा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. वसंतराव कापरे पाटील उपस्थित होते. विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक, शिक्षक, स्कूल कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणाऱ्या सेवकांच्या कार्याची दखल घेतली जाते. शेख सर यांनी कोल्हार शाखेत तब्बल १८ वर्षे उल्लेखनीय सेवा बजावली. या काळात त्यांनी ग्रामस्थ, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांचे मिळवलेले प्रेम व विश्वास आजच्या सेवापूर्ती सोहळ्यातून प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यांच्या कार्याचा हा गौरव निश्चितच प्रेरणादायी आहे.
सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शब्बीर शेख सर यांच्यासारख्या प्रामाणिक, निष्ठावंत आणि निःस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळेच रयत शिक्षण संस्थेचा शैक्षणिक आलेख सातत्याने उंचावत आहे.
विशेष अतिथी ॲड. वसंतराव कापरे पाटील यांनी शेख सर यांच्या जीवनप्रवासाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले की, शिक्षण हे केवळ एका व्यक्तीचे नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे जीवन बदलण्याचे सामर्थ्य ठेवते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण पूर्ण करत शेख सर यांनी ३० वर्षे शैक्षणिक क्षेत्रात सेवा बजावली. अध्यापनाच्या कार्याबरोबरच जिल्हा समन्वयक म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. सी.सी.आर.टी.चे शेख सर म्हणून त्यांची जिल्हाभर ओळख निर्माण झाली. अनेक शिक्षकांना प्रशिक्षण देऊन विविध राज्यांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आज विविध तालुक्यांतील शिक्षकांनी त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याला लावलेली उपस्थिती ही त्यांच्या कार्याची खरी पावती आहे.
अध्यक्षीय मनोगतात ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील म्हणाले की, अनेक सेवापूर्ती समारंभांना उपस्थित राहण्याचा योग आला; मात्र शेख सर यांच्या कार्याप्रती असलेल्या आदरामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहणे मला महत्त्वाचे वाटले. गेल्या १८ वर्षांत त्यांनी विद्यालयातील प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि कामाप्रती असलेली निष्ठा यामुळे विद्यालयातील विविध कार्यक्रम यशस्वी झाले. ते मितभाषी असले तरी आपल्या कृतीतून कामाचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या अध्यापनशैलीमुळे ते विद्यार्थीप्रिय शिक्षक बनले. आपल्या कार्यातून त्यांनी विद्यालयाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. खर्डे पाटील यांनी आपल्या कुटुंबातर्फे शेख सर यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत उपस्थितांचे आभारही मानले.
याप्रसंगी शेख सर यांच्या कन्या डॉ. आयेशा शब्बीर शेख व पुत्र डॉ. शोयब शब्बीर शेख यांनी आपल्या वडिलांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू उलगडत त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा आणि शैक्षणिक कार्याचा गौरव केला.
सत्काराला उत्तर देताना शब्बीर शेख सर भावूक झाले. ते म्हणाले की, कोल्हार शाखेत १८ वर्षे सेवा करताना ग्रामस्थ, स्कूल कमिटीचे सदस्य, पत्रकार बांधव, सहकारी शिक्षक आणि संस्थेतील अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेत रुजू झाल्यानंतर ज्येष्ठ शिक्षकांनी प्रामाणिकपणे व निःस्वार्थ भावनेने काम करण्याचा दिलेला सल्ला त्यांनी आयुष्यभर जपला. याच मूल्यांच्या आधारावर आपली संपूर्ण सेवा पार पाडली. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करताना ॲड. वसंतराव कापरे पाटील यांनी केलेले सहकार्य आपण कधीही विसरू शकत नाही, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. आपल्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध तालुक्यांतून आलेले शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामस्थ आणि मान्यवरांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या सोहळ्यास पत्रकार गणेश सोमवंशी, स्कूल कमिटी सदस्य योगेश कोळपकर, संतोष थेटे, अशोकशेठ असावा, गुगळे,संजय शिंगवी, माजी विस्ताराधिकारी वाकचौरे साहेब, माजी मुख्याध्यापक आहेर सर, वाघमारे सर, वाघ सर, पठाण सर, गमे सर, मुख्याध्यापिका श्रीमती भोईटे मॅडम यांच्यासह विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे प्राचार्य अंकुशराज जामदार,उपमुख्याध्यापक सिताराम बोरुडे तसेच पर्यवेक्षिका संजीवनी आंधळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर गोपाळे व दीपक मगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन आदिनाथ बानकर सर यांनी केले.
तीन दशकांची निष्ठावंत शैक्षणिक सेवा, विद्यार्थ्यांशी जपलेले जिव्हाळ्याचे नाते आणि विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ३१ हजारांची देणगी… शब्बीर शेख सर यांच्या सेवापूर्ती सोहळ्याने उपस्थितांच्या मनात आदर, आपुलकी आणि प्रेरणेची भावना निर्माण केली.



