आरोग्य

खोडाळ्यात अशुद्ध पाण्याच्या प्रश्नाला तोडगा; नळजोडणी अंतिम टप्प्यात, लवकरच शुद्ध पाणीपुरवठा

मोखाडा(लक्ष्यवेध न्यूज):- तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या खोडाळा गावात जलशुद्धीकरण केंद्र बंद पडल्यामुळे नागरिकांना अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येची दखल घेतल्यानंतर आता शुद्ध पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला असून, नळजोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याने गाळमिश्रित पाणी पुरवले जात होते. परिणामी ग्रामस्थांमध्ये पोटाचे विकार वाढू लागले होते. या पार्श्वभूमीवर उपसरपंच उमेश येलमामे आणि काही नागरिकांनी खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्याकडे समस्या मांडली.

खासदारांनी तातडीने हस्तक्षेप करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, मूळ अंदाजपत्रकात तरतूद नसतानाही प्रशासन आणि कंत्राटदारांनी आवश्यक यंत्रसामग्री उभारून नळजोडणीचे काम हाती घेतले. गावातील दोन मुख्य जलकुंभांना थेट नळजोडणी करून पाणीपुरवठ्याची व्यवस्था उभी करण्यात आली आहे.

सध्या हे काम अंतिम टप्प्यात असून पुढील तीन ते चार दिवसांत खोडाळा ग्रामस्थांना शुद्ध पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. खासदारांच्या पाठपुराव्यामुळे ही ज्वलंत समस्या मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button