Breking News
धर्म, मंदिर भूखंड रक्षणासाठी मी तुरुंगात जायला तयार : काळे
आमदार जगताप यांनी ५१ कोटी रुपयांची अब्रूनुकसानीची नोटीस धाडली

अहिल्यानगर : जैन मंदिर भूखंडावरून आमदार संग्राम जगताप यांच्यावर आरोप करणाऱ्या ठाकरे शिवसेना महानगर प्रमुख किरण काळे यांना आमदार जगताप यांनी ५१ कोटी रुपयांची अब्रूनुकसानीची नोटीस धाडली आहे. लेखी व सार्वजनिक माफीनामा प्रसिद्ध न केल्यास फौजदारी, दिवाणी कारवाई सुरू करण्याचा इशारा दिला आहे. यावर पत्रकार परिषद घेत काळेंनी जोरदार पलटवार केला आहे. धर्म रक्षण, मंदिर भूखंड रक्षणासाठी मी तुरुंगात जायला तयार आहे. मी फकीर आहे. मी भगवी झोळी घेऊन दारोदार फिरून आमदारांना ५१ कोटी गोळा करून देणार असल्याचे काळे यांनी जाहीर केले आहे.
आमदार जगताप यांनी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळकावली, हडप केली. त्यावर स्वतःचे राजकीय कार्यालय थाटल. जून जैन मंदिर पाडले, असे आरोप काळे यांनी केले होते. त्यावर जगताप यांचे सदर जागेवर अधिकृत कार्यालय नाही. त्यांचा कोणता फलक, बॅनर नाही. स्वतंत्र, वेगळे अधिकृत कार्यालय असल्याचे जगताप यांनी नोटीस मध्ये म्हटले आहे. काळे यांनी यावर पुन्हा जोरदार आक्षेप घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी धर्मदाय आयुक्त कार्यालयाने सखोल चौकशी सुरू केली आहे.
काळे म्हणाले, जगतापांचा कार्यकर्ता गणेश गोंडाळ याने सदर भूखंडावर त्याचा ताबा असल्याचे, त्या ठिकाणी जगताप यांची ऊठबस असल्याचे प्रसार माध्यमांसमोर सांगितले आहे. मयत महिलेच्या धर्म कार्यासाठीच्या भूखंडावर राजरोसपणे ताबेमारी भूमाफियांनी केली आहे.
त्यांनी माझ्यावर जरूर खटला दाखल करावा. मला तुरुंगात डांबावे. परंतु त्याआधी आ. जगताप, ट्रस्ट अध्यक्ष, सर्व ट्रस्टी, सहकार ट्रस्टी, स्वयंघोषित भाडेकरू यांनी राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज साहेबांच्या समाधी समोर येऊन पुराव्यानिशी चर्चा करावी.
मी खोटा असेल तर नुसता लेखीच माफीनामा काय, मी नाक रगडून माफी मागायला तयार आहे. त्यासाठी तुम्ही वेळ, तारीख सांगा, मी यायला तयार असल्याचे म्हणत काळे यांनी जगताप यांना खुले निमंत्रण दिले आहे. जगताप ते स्वीकारतात का हे आता पाहावे लागणार आहे.



