भोंदूबाबा अशोक खरातचा मुख्य साथीदार जेरबंद; बलात्कार प्रकरणातील संशयिताला कोल्हापूर पोलिसांनी ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले

नाशिक( लक्ष्यवेध न्यूज) :- येथील भोंदू कॅप्टन अशोक खरात याचा निकटवर्तीय आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित महेश भाऊराव आहेर (रा. कासारवडवली, जि. ठाणे) याला कोल्हापूर पोलिसांनी हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. २० एप्रिल २०२६ पासून पसार असलेल्या आहेरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून रात्री उशिरा ठाणे पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आहेर हा ठाणे महापालिकेतून सहायक आयुक्त पदावरून निवृत्त झाला असून, भोंदूबाबा अशोक खरातच्या कथित गैरकृत्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे. पीडित महिलेला खरातच्या दरबारात नेण्यातही आहेरची भूमिका असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
दरम्यान, कोल्हापूर पोलिसांकडून ‘ऑपरेशन ऑलआऊट’ अंतर्गत जिल्ह्यातील लॉजिंग व हॉटेल्सची तपासणी मोहीम सुरू आहे. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पथक हातकणंगले तालुक्यात तपासणी करत असताना नरंदे येथील हॉटेलमध्ये संशयित आहेर उतरल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
आहेरवर एका महिला कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. २०२० ते २०२३ या कालावधीत घोडबंदर परिसरात हा प्रकार घडल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. तसेच, पीडित महिलेला भोंदूबाबा खरातकडे नेऊन जादूटोणा, गुंगीचे औषध आणि अत्याचाराचे चित्रीकरण करून धमकावल्याचाही गंभीर आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
मार्च महिन्यात भोंदूबाबा अशोक खरातविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर एप्रिलमध्ये पीडित महिलेने कासारवडवली पोलिस ठाण्यात आहेरविरोधात फिर्याद दिली होती. त्यानंतर आहेरचा मोबाईल सतत ‘नॉट रिचेबल’ लागत होता. तपासादरम्यान तो कर्नाटक आणि कोकणातील विविध भागांत लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बुधवारी मध्यरात्री तो नरंदे येथील हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले.
बनावट पदवीपासून धमकीपर्यंत वादांची मालिका
महेश आहेर याची कारकीर्दही अनेक वादांनी गाजलेली आहे. सहायक आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यानंतरही त्याच्यावर बनावट पदवीचा वापर केल्याचे आरोप झाले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या मुलगी आणि जावयाला धमकी दिल्याप्रकरणीही त्याचे नाव चर्चेत आले होते. महापालिकेतील कामकाजाच्या काळातही त्याच्याविरोधात अनेक तक्रारी झाल्याची चर्चा होती.



