जोरदार पावसाने मुंबईची मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मनस्ताप

मुंबई (लक्ष्यवेध न्यूज):-राज्यासह मुंबईत जोरदार पावसाने बॅटिंग केली आहे.त्यामुळे उकाड्यापासून हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे मुंबईतील मान्सूनच्या पहिल्याच जोरदार पावसाने मुंबईची अक्षरशः तुंबई झाल्याचे बघायला मिळाले आहे . सायन हायवे लगतच्या एव्हरार्ड नगर येथील सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सबवे पूर्णपणे जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंपाच्या साहाय्याने पाणी उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरवर्षी पावसाळ्यात या भागात पाणी तुंबण्याची समस्या समोर येते. मात्र, यंदाही पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाच्या मान्सूनपूर्व कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. परिणामी तुंबलेल्या पाण्यातून वाट काढत नागरिकांनाजावंलागतआहे.
दुसरीकडे, पूर्व उपनगरात मध्य रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला आहे, परंतु काही ठिकाणी पाणी भरल्याचे समजते आहे. मुंबईत मध्यरात्री पासून सुरू असलेला जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेला आहे. अंधेरी सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून अंधेरी गोखले पुलाचा वापर करा, असे आवाहन वाहन चालकांना केला जात आहे. ईशान्य मुंबईसह उपनगरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग केली आहे. भांडुप आणि इतर भागात सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालीआहे. परिणामी पहिल्याच पावसात नाल्यांची सफाईबाबतची पोलखोल झाली आहे. नाल्यातून सर्व पाणी रस्त्यावर आलं असून दुर्गंधी पसरली आहे. भांडुप कोकण नगर विभागात सकल भागात पाणी साचल्याचे देखील चित्र आहे.



