Breking News

माहूरजवळील किरोळी घाटात टेम्पो दरीत कोसळून तिघे ठार

माहूर( लक्ष्यवेध न्यूज) :-तीर्थक्षेत्र माहूरजवळील किरोळी घाटात भाविकांचा भरधाव टेम्पो दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात काल पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास घडला. यवतमाळ येथून रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी आलेले भाविक दर्शन आटोपून यवतमाळकडे परतत असताना ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ येथील काही भाविक टेम्पोने माहूर येथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर ते पहाटेच्या सुमारास यवतमाळच्या दिशेने परतत होते. दरम्यान, माहूरजवळील किरोळी घाटातील धोकादायक व नागमोडी वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे भरधाव टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत जाऊन कोसळला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. स्थानिक नागरिक व पोलिसांनी क्रेनच्या मदतीने दरीत कोसळलेला टेम्पो बाहेर काढण्यासह त्यातील जखमींना बाहेर काढले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले.

जखमींना तातडीने माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातातील मृतांची ओळख पटविण्याचे तसेच दुर्घटनेच्या नेमक्या कारणाचा तपास करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

रेणुका मातेचे दर्शन घेऊन आनंदाने परतणाऱ्या भाविकांवर पहाटेच्या सुमारास काळाने घाला घातल्याने यवतमाळसह माहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button